नाशिकरोड : राज्य सरकारचा पाठिंबा काढायचा की नाही, याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील. मात्र धनुष्यातून बाण नक्की सुटेल आणि तो वर्मी लागेल, असा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना पक्ष उमेदवारांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, मनपामध्ये सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नाशिकचा विकास खुंटला. नाशिक पवित्र भूमी असून सुरक्षित राहिली पाहिजे. भाजपाने गुंडांना राजाश्रय दिल्याने अभद्र प्रवृत्ती वाढली आहे. नाशिकमध्येही भाजप गुन्हेगारांना घेऊन राजकारण करत आहे. गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे त्यांना जणू ‘येडच’ लागले आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी शिवसेनाच हक्काची आहे, असेही गोऱ्हे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आम्हालाच बहुमत मिळेल, असे म्हणणाऱ्या भाजपची ‘कोणत्याही परिस्थितीत’ या शब्दाची निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे, अशी मागणी देखील गोऱ्हे यांनी केली. तसेच दोन लाख रुपये देण्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामुळे भाजपाचे उमेदवार व नेत्यांची बॅँक खाती तपासावीत. याबाबत निवडणूक आयोग व पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना आपण पदाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या उमेदवारांवर राजकीय आंदोलनाचे व काहीजणांवर हेतुपुरस्सर गुन्हे दाखल केले आहेत. जर गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोणी असेल तर आम्ही गांभीर्याने कारवाई करू. समाजकंटकांना आम्ही पाठीशी घालणार नाही, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बाण नक्की वर्मी लागेल : नीलम गोऱ्हेंचा इशारा
By admin | Published: February 12, 2017 12:44 AM