संत गाडगे महाराज पुलाजवळील खंडेराव महाराज मंदिराजवळील मोकळ्या जागेत उभ्या राहणाऱ्या चायनीज विक्रेत्यांच्या हातगाड्या पेटवून देण्याचा प्रकार घडला होता. त्याअगोदर गांधी तलावातील बोटींनाही अशाच प्रकारे आग लावण्यात आली होती. या दोन्ही घटनांमुळे येथील व्यावसायिकांमध्ये कमालीची दहशत पसरली होती.
दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री खंडणी दिली नाही म्हणून जुन्या नाशकातील म्हसरुळ टेक परिसरात राहणाऱ्या शुभम ऊर्फ शंभू गोरख जाधव, दर्शन ऊर्फ ओमकार रवींद्र सूर्यवंशी या संशयितांनी चायनीज गाड्यांची जाळपोळ केली होती. गाडगे महाराज पुलाजवळ खंडेराव मंदिर बाहेर राऊत, शिरपाली व कुवर यांच्या चायनीज हातगाड्या असून गुरुवारी संशयित या ठिकाणी आले व त्यांनी विक्रेत्यांकडे तीनशे रुपयांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून शंभू व ओमकार यांनी त्यांच्या एका फरार सराईत गुन्हेगाराच्या मदतीने पेट्रोल ओतून तीन हातगाड्या पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हा केल्यानंतर हे दोघेही संशयित शहरातून पसार झाले होते. दोघे शिर्डीत असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, विलास चारोस्कर, कुणाल पचलोरे, राकेश शिंदे आदींनी शिर्डीतून या दोघा संशयितांच्या मुसक्या बांधल्या आहेत. या जाळपोळ प्रकरणात एका सराईत गुन्हेगाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून तो अद्यापही फरार असून लवकरच त्यालाही अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.