वर्षाच्या प्रारंभीच कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून ‘गोदागौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यात नृत्यांगना दर्शना जव्हेरी, दिग्दर्शिका-निर्माती सई परांजपे, लोकसेवा श्रीगौरी सावंत, विज्ञान प्रसार डॉ. माधव गाडगीळ, शिल्पकार भगवान रामपुरे आणि ज्येष्ठ कुस्तीपटू व मार्गदर्शक काका पवार यांना जाहीर करण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रसार होण्यास प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांचा वितरण सोहळा यंदा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातील हे पुरस्कार आता पुढील वर्षी दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्कारा समवेत प्रदान करण्यात येणार आहे.
शिरवाडकर- कानेटकर पुरस्कार
नाट्य परिषदेच्या वतीने यंदा जाहीर करण्यात आलेले शिरवाडकर - कानेटकर पुरस्कार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा प्रदान करता आले नाहीत. अनुक्रमे प्रख्यात साहित्यिक नाटककार शफाअत खान आणि प्रख्यात अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झालेले हे पुरस्कार आता पुढील वर्षाच्या पुरस्कारांसमवेतच प्रदान करण्यात येणार आहेत. त्याशिवाय नाट्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे आणि परिषदेच्या नाशिक शाखेेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांना जीवनगौरव पुरस्कार, तसेच अन्य स्थानिक रंगकर्मींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार नाशिकच्या लोकहितवादी मंडळास प्रदान करण्यात आला, तर प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांना मो. स. गोसावी एक्सलन्स फाउंडेशनचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. सावाना ग्रंथालय भूषण पुरस्कार विनायक रानडे यांना तर सावाना जीवनगौरव गो. तु. पाटील यांना प्रदान करण्यात आला. यंदाचा गिरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना, तसेच सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी दराडे यांना प्रदान करण्यात आला.
विविध संस्थांचे पुरस्कार
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या नाशिक शाखेतर्फे खलील मोमीन यांना सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला, तसेच उत्तराखंड सरकारकडून विद्या चिटको यांना हिंदुस्तान आणि हिमालयरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. पं. शंकरराव वैरागकर यांना छोटा गंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला, तर मधुकर जाधव यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
बालनाट्य स्पर्धा
नाशकात फेब्रुवारी महिन्यात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने बालनाट्य स्पर्धा उत्साहात पार पडली. त्यात टेक केअर प्रथम, मी पुन्हा येईन द्वितीय आणि प्राइड पायपर या नाटकाने तृतीय क्रमांक मिळविला, तसेच राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने राज्य दिव्यांग बाल नाट्य महोत्सवाचे महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजन करण्यात आले होते. त्यात मंकू माकडे प्रथम, डेस्टीनी द्वितीय तर तृतीय मुक्त मी या दिव्यांग बालनाट्याने बाजी मारली.
नाट्य महोत्सव
वसंत पोतदार नाट्य महोत्सवात यंदा प्रथमच हौशी संघटनांनी एकत्रित येत फेब्रुवारी महिन्यात अनोखा नाट्यमहोत्सव भरवला. त्यात हांडाभर चांदण्या, प्रेमा तुझा रंग कसा?, डेस्टीनी, टेक केअर, भोवरा, अंधायुग, औंदा लगीन करायचे या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य कुंभाचेही आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय नाट्य कुंभामध्ये गर्भ, राजगती, न्याय के भवरमे भंवरी या तीन नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.
ऑनलाइन उपक्रम
मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम कोराेनामुळे रद्द करण्यात आले किंवा ऑनलाइन स्वरूपात पार पाडण्यात आले. त्यात ‘लेखक तुमच्या भेटीला’सारखे उपक्रम, तसेच अनेक संस्थांचे उपक्रम, व्याख्यानमाला, महोत्सवही ऑनलाइन पार पाडण्यात आले. त्यामुळे यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ऑनलाइनचे नवीन माध्यम उदयाला आले, तर काही संस्थांच्या वतीने ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नाटकेही बंदिस्त सभागृहात प्रेक्षकांविना सादर करण्यात आली.
गच्चीवरील नाट्य महोत्सव
राज्यात सर्वत्र मार्च महिन्यापासून नाट्यगृहांमधील नाटकांचे सादरीकरण ठप्प झालेले असताना, नाशिकचा कलाकार प्रथमेश जाधव याने घराच्या गच्चीवर रंगमंच उभारून खुल्या रंगमंचाद्वारे ऑनलाइन नाटके सादर करीत या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेणे भाग पाडले. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या नाट्य महोत्सवात पुरुषोत्तम बेर्डे, अतुल पेठे यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकर्मींनी त्यांच्या नाट्यविष्कारांचे सादरीकरण करीत, या नाट्य महोत्सवाला राज्य स्तरावर प्रसिद्धी मिळाली.