देवळा : कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र (२०१४-२०१५) सुरू होण्यापूर्वी भरावीत, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर देवळा तालुक्यातील सहा शाळांतील १८ अंशकालीन निदेशकांना दिलासा मिळाला आहे.सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेने सर्वशिक्षा अभियानांतर्गत ज्या शाळांमध्ये पाचवी ते सातवी या वर्गांची एकूण ५८ संख्या १०० पेक्षा अधिक आहे त्या शाळांवर कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक केली होती. ग्रामशिक्षण समितीमार्फत या शिक्षकांची तासिका तत्त्वावर नेमणूक केली होती. या शिक्षकांच्या नेमणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या त्या शाळातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचे चांगले परिणाम दिसून आले. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी आवडही निर्माण झाली. तालुक्यातील मटाणे, राजगाव, डोंगरगाव, चिंचवे, जिल्हा परिषद विद्यानिकेतन आदि सहा शाळांवर या अंशकालीन निदेशकांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु यानंतर सर्व शिक्षा अभियान कार्यक्रम गुंडाळण्यात आल्याने सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी निधीची तरतूद नसल्याने या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाच्या निकालामुळे या निदेशकांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
कला, क्रीडा आदि मंजूर पदे शाळा सुरू होण्याआधी भरावीत देवळ्यातील अंशकालीन शिक्षकांना दिलासा
By admin | Published: May 18, 2014 7:56 PM