नाशिक : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील गरजू दिव्यांगांना आवश्यकतेनुसार लागणाऱ्या कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यासाठी मोफत नाव-नोंदणी व मोजमाप व तपासणी शिबिराचे आयोजन कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात आले होते.यावेळी विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन हा समाजासाठी मूलभूत जाणिवेचा भाग असून, यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या तपासणी शिबिरामध्ये व्हिलचेअर, श्रवणयंत्र, कुबडी, एम. आर. किट, कॅलिपर, स्प्लिंट, जयपूर फुट, कमोड चेअर, वॉकर, चष्मा, एल्बो क्रचेस, वॉकिंग स्टिक, अंधचष्मा, अंधकाठी, ब्रेलिकट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबिरात ३००हून अधिक दिव्यांग बंधू-भगिनींनी सहभाग नोंदवला. नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून शिबिरार्थी आले होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, प्रकल्प समन्वयक-जितेंद्र दाभाडे, तंत्रज्ञ-वसीम खान व असिस्टंट तंत्रज्ञ कलीम शेख उपस्थित होते.
कृत्रिम अवयव, साधने वाटपासाठी मोफत नोंदणी, तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:20 AM