शैलेश कर्पे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : तालुक्यात असलेल्या पाणीयोजनांना वीज थकबाकीचे ग्रहण लागल्याने वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करण्याची वेळ येत असते. गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने साथ दिल्याने धरणात पाणीसाठा शिल्लक राहत असला तरी पाणीयोजना समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका ग्रामस्थांना कृत्रिम टंचाईच्या खाईत ढकलत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील वाड्यावस्त्यांवर व पश्चिम पट्ट्यातील काही डोंगराळ वाड्यापाड्यांना टंचाईची झळ जाणवू लागली आहे. या वाड्यावस्त्यांवर विविध पाणीयोजनांचे पाणी जात नसल्याने व विहिरींची पाणीपातळी खालावू लागल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत असल्या तरी वाड्यावस्त्यांवर टंचाईची झळ कमी-अधिक प्रमाणात जाणवू लागली आहे. अद्याप एकाही गावाचा अथवा वाड्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचा प्रस्ताव आला नसला तरी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी काही प्रमाणात शेतकऱ्यांना टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ लागली आहे.
तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव व कणकोरीसह पाच गावांना पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. भोजापूर धरणात सध्या ४५ टक्के पाणीसाठा आहे. तथापि, दोन्ही पाणीयोजनांची वीजबिल थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या गावांकडून पाणीपट्टी वेळच्या वेळी भरली जात नाही व समित्यांकडून वसुलीसाठी कडक कारवाई केली जात नसल्याने थकबाकींचा डोंगर झाला आहे. मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योेजनेत समाविष्ट गावांकडे सुमारे ५५ ते ६० लाख रुपये थकबाकी आहे. तर सुमारे २५ लाख रुपयांच्या आसपास वीज थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात योजनेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. तेव्हा योजनेतील गावांना कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागला होता. पाच लाख रुपये थकबाकी भरल्यानंतर योजना सुरळीत झाली. या योजनेतील गोंदे, मनेगाव, माळवाडी, पालवेवाडी, भोकणी, धारणगाव, रामनगर, दोडी बुद्रुक या आठ गावांना सध्या चार ते पाच दिवसाआड पाणी मिळत आहे.
हीच अवस्था भोजापूर धरणातून राबविण्यात आलेल्या कणकोरीसह पाच गाव योजनेची आहे. दोन्ही मऱ्हळ योजनेचे पाणी घेत नाही. तर पाच गावांकडे सुमारे ४५ लाख रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. वीजबिल थकबाकी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या योजनेचाही काही दिवसांपासून वीज थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ आली होती. मात्र, काही प्रमाणात थकबाकी भरल्यानंतर योजना पुन्हा कार्यान्वित झाली.
पश्चिम पट्ट्यातील ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ज्या उंबरदरी धरणातून राबविली जाते त्या धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, येथील कृत्रिम टंचाईला काहीवेळा थकबाकीच जबाबदार होते. पूर्व भागात गोदावरी उजवा कालव्यावर वावीसह ११ गाव व वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेतील गावांना अद्याप टंचाईची झळ नसली तरी वाड्यावस्त्यांवर टंचाईचा सामना करावा लागतो. या दोन्ही योजनांची समाविष्ट गावांकडे लाखांच्या घरात थकबाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की आल्यावर नागरिकांना कृत्रिम टंचाईची झळ सहन करावी लागते. नायगावसह ९ गाव व बारागावपिंप्रीसह ६ गाव योजना मजीप्राकडे असल्या तरी वीज थकबाकीचा प्रश्न निर्माण होत असतो.
गेल्या आणि यावर्षी सुदैवाने सिन्नरकरांना टॅँकरची गरज भासली नसली तरी कृत्रिम टंचाईचा अनेकदा सामना करावा लागतो. त्यामुळे पाण्यासाठी भटकंतीची वेळ येते.
इन्फो...
मनेगावसह १६ गाव योजनेचा एक पंप नादुरुस्त
भोजापूर धरणात पाणी असले तरी या ना त्या कारणाने नागरिकांना कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागतो. मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठ्याचा ४० अश्वशक्तीचा एकच पंच सुरू आहे. दुसरा पंप सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. १६ पैकी केवळ ८ गावे पाणी घेत असताना टोकाच्या भोकणी गावाला आठ ते पंधरा दिवसांतून एकदा पाणी मिळते. पंधरा दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळत असल्याने कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागतो.
टंचाईग्रस्त वाड्यापाड्या - ३
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना- ७
नळपाणीपुरवठा योजना- ११०
पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर - ३
फोटो ओळी- मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे दापूर येथील जलशुद्धीकरण केंद्र
फोटो ओळी- १८सिन्नर२
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील उंबरदरी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे.
===Photopath===
180421\18nsk_8_18042021_13.jpg
===Caption===
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील उंबरदरी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचे चित्र आहे.