इंदिरानगर : नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.शहरास पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरणातील पाणी ३१ जुलैपर्यंत शहरास पुरविण्यात येणार असून, तसे नियोजनही करण्यात आले आहे. असे असतानाही गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही नासर्डी ते पाथर्डी या परिसराला सुमारे वीस वर्षांपासून नेहमीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याची महापालिकेने दखल घेत सुमारे दोन वर्षांपूर्वी मुकणे धरणापासून थेट जलवाहिनी टाकण्यास कामास सुरुवात करून कोट्यवधी रुपये खर्च केले. सदरचे काम पूर्ण झाल्याने नासर्डी ते पाथर्डी परिसराचा पाणीप्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे मुकणे धरणाचे पाणी सुरू होऊनही पाणीटंचाई अद्याप कायम आहे. परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने काही ठिकाणी नागरिकांनी स्वखर्चाचे टँकरद्वारे पाणीपुरवठा करून घ्यावा लागत आहे. त्यामुळे मुकणे धरणाचे पाणीपुरवठा सुरू होऊ नियोजनाअभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.कमी दाबाने पाणीपुरवठाज्या वेळेस प्रभाग क्रमांक ३० मधील परिसरात पाणी सोडण्यात येते, त्याच वेळेस प्रभात १६ व २३ मध्ये पाणी सोडण्यात येत असल्याने ते पाणी सरळ खाली प्रभाग १६ व २३ मध्ये निघून जाते. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३०मधील राणेनगर, राजीवनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, श्रद्धाविहार कॉलनी यांसह परिसरात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे.
इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:38 AM