पिंपळगाव वाखारी : येथे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा उद्रेक होऊन महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. पाणीटंचाईबाबत ग्रामस्थांच्या उद्रेकाला कारणीभूत पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले संथ काम आणि ग्रामपंचायतचे भोंगळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सकाळी साडेनऊ वाजता ग्रा. पं. कार्यालयावर आलेल्या हंडा मोर्चाला सामोरे जाण्यासाठी ग्रा. पं. कार्यालयात ग्रा. पं. कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्य कोणीच उपस्थित नसल्याने मोर्चेकऱ्यांनी जि. प. सदस्य भारती पवार यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली असता त्यांच्या सांगण्यावरुन नंतर सर्व धावपळ करत कार्यालयात पोहचले.पिंपळगाव वाखारी येथे काही महिन्यांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने होणारी पाणीटंचाई ग्रामस्थांनी समजून घेतली; परंतु कासवगतीने पूर्णत्वाला गेलेली ही योजना अजून पिंपळगावकरांची पाणीटंचाई दूर करू शकली नाही. गावासाठी पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असतानाही ५-६ दिवस पाणी सोडले जात नाही. याबाबत विचारणा करणाऱ्यांना वीज वितरण कंपनीची अडचण सांगून वेळ निभावली जात आहे. पिण्याचा पाणी प्रश्न सोडवताना असणाऱ्या अडचणी युद्ध पातळीवर सोडविण्याची गरज असता त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर उदासीनता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिंपळगाव वाखारीत कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2016 11:34 PM