नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणी योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला पाणीपुरवठा केला जातो. भोजापूर धरणातून पाच गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ तसेच बहुतांश नागरिक हे गावातच वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव योजनेतील पाण्याचा स्त्रोत आहे.गेल्या आठ वर्षांपासून गावात व वस्तीवर दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. वारंवार योजनेत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकार घडत आहेत.धरणात पाणी आहे तर वेळेवर वीजपुरवठा नाही. तर वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला तर विद्युत पंप पाणी उपसा करत नाही, तर काही ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना नेहमीच अडचणी येत आहे. मात्र, नांदूरशिंगोटे येथील ग्रामस्थांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी वणवण होत असून विकत पाणी घ्यावे लागत आहे.गेल्या पाच ते सहा दिवसापासून गावात पाणीपुरवठा न झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीपुरवठा योजनेची थकबाकी वाढत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. पाणीपुरवठा योजनेत पाच गावे असले तरी प्रामुख्याने नांदूरशिंगोटे व मानोरी या दोन ग्रामपंचायत योजनेत सहभाग असतो. त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालविताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. पाणीपुरवठा समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहेत.स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठानांदूरशिंगोटे गावात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने महिलावर्गाचे हाल झाले होते. गावातील एका युवकाने ही बाब लक्षात घेऊन स्वखर्चातून काही भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिल्याने थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. युवा कार्यकर्ते राजेंद्र दराडे यांनी पदरमोड करत दोन दिवसांत एका टँकरने दहा ते बारा खेपा केल्या. त्यामुळे महिलांना पिण्यासाठी व वापरासाठी पाण्याचा आधार मिळाला आहे.