नाशिक : नाशिक कलारसिक आणि आर्किटेक्ट इंजिनिअर्स असो.तर्फे ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या ‘रंगोत्सव’ उपक्रमात चित्रकार नानासाहेब येवले यांच्या निसर्गचित्रण प्रात्यक्षिकांमध्ये कलाप्रेमी दंग झाले.वैराज कलादालनात हा कार्यक्रम झाला. यावेळी आर्किटेक्ट असोसिएशनचे योगेश कासार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे संजय पाटील, बाळासाहेब मगर आदी मान्यवर उपस्थित होते. मगर यांनी कै. शिवाजी तुपे यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी जलरंगात अतिशय सुबक निसर्गचित्रांचे प्रात्यक्षिके दाखविली. जलरंगातील रंगसंगती विद्यार्थ्यांनी समजून घेतली. यावेळी प्रदर्शनही भरविण्यात आले होते. प्रदर्शनात त्यांची २० निसर्गचित्रे मांडली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी झाली होती. चित्रकार अशोक ढिवरे व मुक्ता बालिगा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ चित्रकार प्रा. बाळ नगरकर, ज्ञानेश बेलेकर, आनंद सोनार, सुहास जोशी, पंडित सोनवणी, अनिल तुपे, सी. एल. कुलकर्णी, माधुरी चौक, राजा पाटेकर, कैलास हयाळीज, संध्या केळकर, अनिल माळी यांच्यासह कलाप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.
रंगोत्सव प्रात्यक्षिकांत कलाप्रेमी दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:43 AM