सिन्नर : तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाजार समितीचे माजी सभापती अरुण गोविंद वाघ यांची, तर उपसरपंचपदी मनीषा सुरेश साबळे यांची बिनविरोध निवड झाली. अरुण वाघ यांच्या घरात सलग तिसऱ्यांदा सरपंचपद चालून आले.
सरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत सरपंच पदासाठी अरुण गोविंद वाघ यांचा, तर उपसरपंच पदासाठी मनीषा सुरेश साबळे यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाले. दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरल्याने त्यांची अनुक्रमे सरपंच आणि उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कैलास भदाणे यांनी घोषित केले. याप्रसंगी सदस्य सोनाली तुकाराम डावखर, अलका रमेश साबळे, कांताराम निवृत्ती कुर्हाडे, शरद बाळनाथ साबळे आदी उपस्थित होते, नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत अरुण वाघ यांच्या गटाचे ६, तर विरोधी गटाचे तीन सदस्य निवडून आले आहेत.
फोटो - २६ भोकणी सरपंच
सिन्नर तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अरुण वाघ, तर उपसरपंचपदी मनीषा साबळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना सदस्य आणि कार्यकर्ते.