नाशिक : देशातील ख्यातनाम नेत्रोपचार रूग्णालयांची साखळी असलेल्या ‘एएसजी’ नेत्र रुग्णालयाने महाराष्ट्रातील आपली दुसरी शाखा गंगापूर रोडवरील बॉस्को सेंटर येथे सुरु केली आहे.
रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. वसंत रामनाथन, डॉ. जयानंद उरकुडे, डॉ. रश्मी सिंह, डॉ. दीक्षा पंत, डॉ. अक्षय तायडे यांनी ही माहिती दिली. या रूग्णालयात मोतीबिंदू (फेको), लॅसिक, व्हिट्रीओ-रेटिना, ऑक्युलोप्स्टी, ग्लुकोमा, कॉर्निया, तिरळेपणा, न्युरो-ऑप्थॅल्मॉलॉजी आदी नेत्ररोगांच्या श्रेणींवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध राहणार आहेत. नाशिककरांना या सुविधा रविवारीदेखील उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिकमधील प्रकल्पामध्ये डोळ्यांशी निगडीत सर्व आजार, जटील शस्त्रक्रिया, निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहेत. तसेच एएसजी नेत्र रूग्णालय वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करून गरीब व गरजू रूग्णांनाही नेत्रसेवा देणार असल्याचे डॉ. रामनाथन यांनी सांगितले.
या समूहाची स्थापना २००५मध्ये डॉ. अरूण सिंघवी आणि डॉ. शशांक गंग या ‘एम्स’मधील दोन अनुभवी व्यक्तींनी केली होती. त्यानंतरही अनेक अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचा समूहात समावेश झाला असून, आता १००हून अधिक डॉक्टर्स देशभरातील २७ शहरांमध्ये सेवा देत आहेत. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम नेत्रोपचार सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. उरकुडे यांनी सांगितले.
फोटो
१६एएसजी फोटो