नाशिक- शहरी भागातील विविध ठिंकाणी आरोग्य सर्वेक्षणासाठी जाणाºया आशा कर्मचाऱ्यांना काही भागात विरोधाला सामोरे जावे लागत आहे. वडाळा परीसरात काही कर्मचा-यांना विरोधाला सामोरे जावे लागले तसेच फार्म हिसकावण्याचे प्रकार घडल्याने संबंधीत महिला कर्मचारी धास्तावल्या आहेत.
दरम्यान, वस्त्यांमध्ये सर्वेक्षणासाठी जाणा-या आशा कर्मचा-यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी महाराष्टÑ राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.महापालिका क्षेत्रात १२२ झोपडपट्यांमध्ये आरोग्य विषयक काम करण्यासाठी १२२ आशा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सध्या कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध वसाहतींमध्ये त्यांना सर्र्वेक्षणाचे काम देण्यात आले आहेत.
नाशिक पुणे रोडवरील बजरंगवाडी अंतर्गत काम करणा-या अरूणा आहिरे, प्राची आढाव, हर्षीया साकुर शेख, सीमा मोरे या वडाळा परीसरातील विविध भागात सर्वेक्षण करत असताना गुरूवारी (दि.९) त्यांना काही व्यक्तींनी अडवले. तसेच त्यांच्याकडील फॉर्म घेऊन फाडून टाकले. पुन्हा या भागात फिरकू नका असा त्यांना दम देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचारी धास्तावल्या असून त्यांनी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.