यावर्षीच्या खरीप हंगामासाठी मृग नक्षत्राच्या प्रारंभापासूनच पावसाने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे खरिपातील बाजरी, मका, मूग, भुईमूग, तूर, तीळ, आदी धान्य पेरणीवेळी खूपच धांदल केली होती. त्यामुळे काही ठिकाणी मिरगाची पेरणी झाली, तर काही ठिकाणी उशिरा पेरणी करावी लागली होती. वेळेवर पेरणी झालेली पिके वाढीवर असतानाच मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी वेळीच औषध फवारणी उपाययोजना केल्यामुळे काही प्रमाणात पिकांवरील करपा, तसेच कीटकजन्य रोग आटोक्यात आला. पिकांची निंदणी आणि रासायनिक खतांची मात्रा योग्यवेळी दिल्याने शिवारातील पिके हिरवीगार दिसू लागली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून वरुणराजाने अचानक दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावला होता. ऐन पिकांच्या वाढीच्या वेळेस पिकांना पाणी न मिळाल्याने उभी पिके पिवळी आणि करपू लागली होती सिंचनाने पाणी देण्यासाठी अजून नदी, नाले, विहिरींना पाणी पाझरले नसल्याने पावसाच्या पाण्यावर विसंबून राहावे लागले होते. परंतु, चालू सप्ताहात पावसाच्या सरी बरसल्याने पिकांना तूर्तास जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले झाले आहे.
आश्लेषा नक्षत्राने मारले, ‘मघा‘ने शेतकऱ्यांना तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:17 AM