नाशिक : भाजीपाला खरेदी करण्यासाठी आपल्या मुलीसह बाहेर पडलेल्या अशोकामार्गावरील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी (दि.२३) संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञाच चोरांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाक्षी विजय साळूंखे (४८, रा.श्रीजी प्राईड,अशोकामार्ग) या बुधवारी संध्याकाळी आपल्या मुलीसोबत घेवून परिसरात भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर पायी घरी परतत असताना येथील महाराष्ट्र बँकेच्याजवळ अशोका पोलीस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साळुंखे यांच्या गळ्यातील करून दोन्ही मायलेकी मारूती सुझूकी शोरूम समोरून पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे २३ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चालू वर्षभरातील ही ९७वी सोनसाखळी चोरीची घटना आहे. यापुर्वीही अशोकामार्गावर सोनसाखळी, मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथून स्मार्ट पोलीस चौकी काही मीटर अंतरावर आहे. ही पोलीस चौकी स्मार्ट जरी असली तरी या पोलीस चौकीला स्वतंत्र दुरध्वनी आतापर्यंत उपलब्ध झालेला नाही. यामुळे नागरिकांना थेट पोलीस चौकीपर्यंत धाव घेत गुन्ह्याची माहिती द्यावी लागते. पोलीस चौकीला स्वतंत्र दुरध्वनी क्रमांक त्वरित उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.