अशोक मार्गावरील अतिक्रमणामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. वाहने चालविणे आणि पायी चालणेही दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी जणूकाही ताब्यात घेतल्याची परिस्थिती आहे.
या परिसरात गॅरेज मालक ग्राहकांची वाहने पदपथ व रस्त्याच्या कडेला उभी करीत असल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. पोलीस आयुक्त, मुंबई नाका पोलीस व अशोका मार्ग पोलीस चौकीला निवेदन देऊनही कारवाई होत नाही. पोलिसांनी केवळ नोटिसा बजवल्या असून, अपघात झाल्यास गॅरेज मालकांना जबाबदार धरू, असे सांगितले आहे. हा परिसर महापौरांच्या वॉर्डात येत असूनही महापालिकेचे अधिकारी नागरिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात.
वारंवार तक्रारीनंतरही कारवाई होत नाही. यापूर्वीही या ठिकाणी अपघात होऊन काही लोक मृत्युमुखी पडले आहेत. मुंबई नाक्याहून नाशिक रोडला जाण्यासाठी अशोका मार्ग सोयीचा झाला आहे. हा रस्ता रुंद करण्यात आला आहे. मात्र, गतिरोधक नसल्याने वाहने वेगात धावतात. मंगळवारी दुपारी वेगात आलेली कार दुभाजकाला धडकून उलटी झाली. मात्र, सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नसून, पादचारी जखमी झाला आहे. अशोक मार्गावरील अतिक्रमणे हटवून बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
140921\14nsk_53_14092021_13.jpg
अपघातात कारचे झालेले नुकसान