नाशिक : जिल्ह्यातील आश्रम शाळा सुरू करण्यास आता चिकुनगुन्या, डेंग्युचा अडसर येत असून, काही गावातील सरपंचांनी तसे पत्रच प्रकल्प कार्यालयांना दिले असल्याने जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आश्रम शाळा सुरू होऊ शकल्या असून, विद्यार्थ्यांची उपस्थितीही अल्प प्रमाणात असून, अद्याप काही गावांमधील शाळा सुरू होण्याबाबत ठराव झालेले नाहीत. मागील वर्षीपासून बंद असलेल्या आदिवासी भागातील आश्रम शाळा २ ऑगस्टपासून सुरू करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने दिले असून, त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांच्या सहमतीसोबतच शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक ग्राम पंचायतीचाही ठराव महत्त्वाचा आहे. काही गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे ठराव झाले आहेत, तर काही गावांतील सरपंचांनी चिकुनगुन्या, डेंग्यू या आजारांच्या साथीची कारणे देत शाळा सुरू करण्यास सध्या तरी असमर्थता दर्शविली आहे. यामुळे अद्याप पूर्णपणे शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत ४० शासकीय आणि ३९ अनुदानित शाळा आहेत. यापैकी २३ शासकीय आणि २ अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. शासकीय आश्रमशाळेत ३४२ मुले आणि ५१८ मुली अशी एकूण ८६०, तर अनुदानित आश्रमशाळेत २६ मुले आणि २८ मुली इतकीच उपस्थिती आहे. नाशिक प्रकल्प कार्यालयांतर्गत अगदीच कमी शाळा सुरू होऊ शकल्या आहेत. आदिवासी भागातील आश्रमशाळा निवासी असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी कोरोनाबाबत आदिवासी बांधवांमध्ये असलेल्या असलेल्या गैरसमजाबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे.
आश्रम शाळांना आता डेंग्यु, चिकुनगुन्याचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 01:40 IST
जिल्ह्यातील आश्रम शाळा सुरू करण्यास आता चिकुनगुन्या, डेंग्युचा अडसर येत असून, काही गावातील सरपंचांनी तसे पत्रच प्रकल्प कार्यालयांना दिले असल्याने जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आश्रम शाळा सुरू होऊ शकल्या असून, विद्यार्थ्यांची उपस्थितीही अल्प प्रमाणात असून, अद्याप काही गावांमधील शाळा सुरू होण्याबाबत ठराव झालेले नाहीत.
आश्रम शाळांना आता डेंग्यु, चिकुनगुन्याचा अडसर
ठळक मुद्देअल्प प्रमाणात उपस्थिती : कळवण प्रकल्पात ८६० विद्यार्थ्यांची उपस्थिती