नाशिक : विजेचे सुवाहक, दुुर्वाहक ओळखण्यासोबतच, हवेच्या दाबामुळे दोरीवर धावणारे रॉकेट आणि स्वच्छ आणि स्मार्ट गाव आदी प्रकल्पांच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध आविष्कार सादर केले. नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि स्प्रिन्सस्टार आयटी सोल्युशन्स यांच्यातर्फे शुक्रवारी (दि.४) आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध प्रकल्पांची माहिती देत प्रात्यक्षिकही करून दाखविले. या प्रदर्शनात ठेपणपाडा येथील आश्रमशाळेतील कावेरी ठेपणे हिच्या ‘गृहसंरक्षण प्रणाली’ अर्थात घरासाठीच्या सिक्युरिटी अलार्मच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.आदिवासी विकास भवन आवारातील या एकदिवसीय विज्ञान प्रदर्शनात दिंडोरी तालुक्यातील निकडोळ, टिटवे, थेपनपाडा आदी पाड्यावरील शासकीय आदिवासी आश्रमशाळाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, तांत्रिक समिती सदस्य हेमलता बिडकर, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांची प्रशंसा केली. दरम्यान, दुपारच्या सत्रात माजी आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.विज्ञान प्रदर्शनातील विजेतेआदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनात ठेपणपाडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील कावेरी ठेपणे हिने प्रथम व नाळेगाव आश्रमशाळेतील मनीषा पालवे द्वितीय पारितोषिक देण्यात आले, तर निगडोळ येथील आश्रम शाळेतील दुर्गा वाघेरे, उज्ज्वला धोडी, हर्षदा वाघेरे यांना तृतीय पारितोषित देण्यात आले.
आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी घडवला विज्ञानाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:16 AM