सिन्नर: दोन वर्षापासून खंडित झालेली अष्टविनायक दर्शन बससेवा सिन्नर आगाराने पुन्हा सुरू केली आहे. कोरोना संकटासह विविध कारणांनी ही सेवा बंद होती. आता ती पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. एकाच गावातील ४४ भाविक एकत्रित आल्यास थेट गावातून दर्शन यात्रा सेवा देण्यात येणार आहे.
सिन्नर आगाराने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान अष्टविनायक दर्शन बस सेवा ठेवली आहे. त्यासाठी ऑनलाईन तिकीट निश्चिती सेवाही सुरू करण्यात आली आहे. १२९५ रुपये भाडे आकारण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी ६५० रुपये दरात यात्रा करता येणार आहे. भाविकांचा या दर्शन सेवेला प्रतिसादही मिळत आहे. या सेवेमुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडणार आहे. २०१६ पासून सिन्नर बस आगाराने अष्टविनायक दर्शन बस सेवा सुरू केली आहे. प्रत्येक गणेश चतुर्थीपूर्वी बस सेवा सुरू करण्यात येते. तीन दिवसात अष्टविनायकाचे दर्शन भाविकांना घडविण्यात येते. या बस सेवेला प्रथमपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. तथापि २०१९ मध्ये ही सेवा बंद राहिली. कोरोना महामारीत ती सुरू करता आली नाही. ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत भाविकांकडून मागणी होत होती. त्यामुळे आगाराने दोन वर्षानंतर पुन्हा अष्टविनायक दर्शन बससेवा सुरू केली आहे. ४४ भाविकांनी एकत्रित येऊन आगाराकडे नोंदणी केल्यास गावातून सेवा देता येईल. तसे केल्यास बस सेवा अधिक सुलभ पद्धतीने देता येईल अशी माहिती आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी दिली.
इन्फो...
जाळीचा देव बससेवेला प्रतिसाद
आगाराने कोरोनामुळे वर्षभरापासून स्थगित केलेली जाळीचा देव दर्शन बससेवा दोन महिन्यापासून पूर्ववत सुरू केली आहे. या सेवेलाही भाविकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडली आहे. चार वर्षापासून आगाराने उत्पन्न कमविण्यात राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. कोरोनानंतर हा लौकिक पुन्हा मिळविण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत.