----
मनपा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा
नाशिक- महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदाेन्नती देण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता त्याला वेग आला आहे. पदोन्नती समितीच्या बैठकादेखील पूर्ण झाल्या आहेत मात्र अद्यापही पदोन्नती देण्यात आलेली नाही. फेब्रुवारी महिन्याच्या आत कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी, असे आदेश स्थायी समितीने दिले होते. मात्र, त्यानंतरही अद्याप पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा आहे.
---
त्या वृक्षांबाबत निर्णय प्रलंबित
नाशिक- महापालिकेच्या वतीने रस्त्यातील झाडे हटवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. रस्ता रुंदीकरण करताना काही भागात जुनी झाडे थेट रस्त्याच्या मधोमध आली आहेत. न्यायालयाने वड, उंबर, पिंपळ अशा देशी प्रजातीची झाडे न हटवण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, त्यामुळे अपघात होत असल्याने ही झाडे हटवावी, अशी मागणी हेात आहे.
----
नाशिकरोड, गंगापूररोडला नाट्यगृह
नाशिक- महापालिकेच्या अंदाजपत्रकात गंगापूररोड आणि नाशिकरोड येथील कोठारी यांच्या जागेत नाट्यगृह उभारण्यासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे आता शहरात आणखी दोन नाट्यगृहे वाढणार आहे. सध्या शहरात महाकवी कालिदास नाट्यगृह असून प्रसंगी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात नाटके होतात. मात्र आता शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता दोन नाट्यगृहे साकारली जाणार आहेत.
---
महापालिकेच्या वतीने आता जप्ती मोहीम
नाशिक- महापालिकेच्या वतीने घरपट्टी वसुलीसाठी आता कठोर पावले उचलून मालमत्ता जप्तीची मोहीम राबवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आर्थिक संकटदेखील आले. त्यामुळे महापालिकेने कठोर कारवाईपेक्षा सवलतींवर भर दिला होता. अभय योजना देखील राबवण्यात आली होती. मात्र, आता ही सवलत संपल्यानंतर महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
---
शहराच्या मध्यवर्ती वाहनतळाची गरज
नाशिक- शहराच्या मध्यवस्ती बाजारपेठेतील वाहनतळ अनेक राजकीय नेत्यांच्या ताब्यात असल्याने तेथील वाहनतळ जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे वाहने कोठे लावावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नागरिक मिळेल त्या जागीच वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. शिवाजी स्टेडियम या ठिकाणी भूमिगत वाहनतळाचा प्रस्ताव असला तरी त्यास क्रीडा संघटनांचा विरोध आहे.
-----
फेरीवाल्यांकडून भुईभाडे वसुली बंदच
नाशिक- महापालिकेच्या वतीने रस्त्यावर विक्री व्यवसाय थाटणाऱ्यांकडून आकारण्यात येणारे भुई भाडे वसुली बंद आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. डाॅन बॉस्को रोडवरील एका बेकायदा फेरीवाला क्षेत्रासंदर्भात उच्च न्यायालयाने महापालिकेेची कान उघडणी केल्यानंतर जे बेकायदा विक्री व्यवसाय करतात, त्यांच्याकडून रक्कम वसुली कशी काय केली, असा प्रश्न केल्यानंतर ही वसुली थांबली आहे. परंतु दुसरीकडे महापालिका संबंधितांना हटवत नसल्याने अतिक्रमणांचा गुंता वाढत चालला आहे.