नाशिक : शहरात गॅस पाईपलाईनसाठी गल्ली, बोळ, चौकात मोठ्या प्रमाणात खोदण्यात येत असलेल्या रस्त्यांचे ३० मे पुर्वी डांबरीकरण करण्याबरोबरच आगामी पावसाळा लक्षात घेवून ३० एप्रिल नंतर शहरातील कोणताही रस्ता फोडला जाणार नाही अशी तंबी देत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रस्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली.
यात प्रामुख्याने टेलीकम्युनिकेशन लाईन्स व गॅस पाईपलाईनसाठी रस्ते फोडण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून, खोदलेले रस्ते नीट बुजविण्यात न आल्याने त्यातून अपघात होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे. त्यामुळे ज्या रस्त्यांना यापुर्वी परवानगी देण्यात आली आहे. ते सर्व रस्ते १५ मे पर्यंत पुर्ववत होतील याची काळजी घेण्याची सुचना बांधकाम विभागाला केली असून, ३० एप्रिलनंतर कोणताही रस्ता फोडला जाणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. एमएनजीएल, पाणी पुरवठा, मलवाहिका, विद्युत व टेलीफोन केबल यासाठी तोडण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती ३० मे पर्यंत पुर्ण करण्यात यावे, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते दुरूस्तीसाठी निविदा काढून १५ मे पर्यंत वर्कऑर्डर देण्याची दक्षता घ्यावी अशी सुचनाही केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"