सारडा सर्कल चौकात कोंडी
नाशिक : सारडा सर्कल चौकातून फाळके रोड तसेच उर्दू शाळेकडे जाणाऱ्या वाहनधारकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने चौकातून जाणाऱ्या या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर कोंंडी होत आहे. या चाैकातून जुने नाशिकमध्ये जाणाऱ्या दुचाकी तसेच रिक्षाचालकांची नेहमीच वर्दळ असते. चौकातून जाताना मुख्य रस्त्यावरील वाहनधारकांना चौकात थांबावे लागते. त्यामुळे वाहनधारकांना कोंडीला सामोरे जावे लागते.
अशोकाकडे जाणारा मार्ग दुर्लक्षित
नाशिक : आयनॉक्स सिग्नलकडून अशोका मार्गाकडे जाण्यासाठी वळणाऱ्या वाहनधारकांना खोदकाम केलेल्या रस्त्याचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी येथे पाइपलाइनचे काम करण्यासाठी खोल खड्डा खोदण्यात आला होता. काम झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बुजविण्यात आला होता. परंतु, आता हा रस्ता वाहतूक कोंडीला आमंत्रण देत आहे. या खड्ड्याला वळसा घालून वाहनधारकांना जावे लागत आहे.
मिरची चौकातील सिग्नलकडे दुर्लक्ष
नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील मिरची-टाकळी चौकातील सिग्नलकडे दुर्लक्ष करीत वाहनधारक सिग्नल नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. सिग्नल असतानाही वाहनधारक नेहमीच सिग्नल तोडत असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. या चौकात गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची गरज असल्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
बाजारात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी दाखल
नाशिक : नाशिकच्या फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली असून, शहरात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी दिसू लागली आहे. जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात मोजक्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. जिल्ह्यातील स्ट्राॅबेरी अद्याप बाजारात आली नसली तरी परजिल्ह्यातून स्ट्रॉबेरी बाजारात दाखल झाली आहे. सध्या किरकोळ विक्रेत्यांकडे देखील स्ट्रॉबेरी दिसत आहे.