दुकानांसमोरील लाकडी शेड्स चोरीस
नाशिक: शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या अशोका मार्गावरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर उभारलेल्या लाकडी शेड्ची लाकडे चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या सुमारास शेकोटी करण्यासाठी लाकडांची चोरी होऊ लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
तपोवन रस्त्यावर जॉगर्सची गर्दी
नाशिक: तपोवन रस्त्यावर सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास जॉगर्सची संख्या वाढली आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूने विस्तीर्ण असे पदपथ असल्याने जॉगर्सची सोय झाली आहे. निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळी आणि सायंकाळी येथे योगा करणाऱ्यांकडून पसंती दिली जात आहे.
नाकाबंदीचे बॅरिकेड्स दिवसाही कायम
नाशिक: शहरात सध्या रात्रीची संचारबंदी असल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी चेकिंग पॉइंट सुरू केले आहेत. काही मार्गांवर नाकबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे असे मार्ग बॅरिकेड्स टाकून बंद केले जातात. एखादे वाहन जाईल इतकीच जागा सोडली जाते. परंतु दिवसाही बॅरिकेड्स तसेच ठेवले जात असल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडतो.
उपनगरमधील गतिरोधक धोक्याचे
नाशिक: उपनगरमधील सिंधी कॉलनी परिसरात अगदी जवळ तीन गतिरोधक असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. या मार्गावरील सुसाट वाहतुकीला आळा घालण्यासाठी गतिरोधक टाकण्यात आले आहेत; परंतु त्यांच्यात अंतर कमी असल्याने वाहनांची कोंडी होते, त्यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.
लेाखंडे मळ्यात भाजी मार्केटची गरज
नाशिक: लोखंडे मळा परिसराचा वाढता विस्तार लक्षात घेता या परिसरात महापालिकेने स्वतंत्र भाजीमार्केट सुुरू करण्याची मागणी होत आहे. अत्यंत वर्दळीच्या रस्त्याच्या कडेलाच भाजी विक्रेते तसेच अन्य हातगाडीवाले व्यवसाय करीत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. स्वतंत्र मार्केट केल्यास सर्वांचीच अडचण दूर झाली आहे.