नाशिक : गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आलेल्या मालेगाव तालुक्यातील सडक सौंदाणे येथील प्रभाकर दत्तू पवार यांच्या मारेकऱ्यास बारा तासांत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली़ संतोष श्रावण कुवर (२०, रा़ मेशी, ता़ देवळा) याने उसनवारीतून हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ देवळा तालुक्यातील मेशी-महालपाटणे रस्त्यावर शनिवारी (दि़ १६) प्रभाकर पवार यांच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती़ देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याची उकल करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिले होते़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे हे मध्यरात्रीच्या सुमारास मारेकºयाचा शोध घेत होते़ त्यांना मयत पवार यांच्यासोबत एक इसम मेशी गावातून महालपाटणे गावाकडे गेल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचाºयांनी माहिती काढून संशयित संतोष कुवर यास ताब्यात घेतले़ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक एम़ एस़ रणमाळे, पोलीस हवालदार नामदेव खैरनार, अशोक जगताप, पोलीस नाईक जालिंदर खराटे, पोलीस शिपाई लहू भावनाथ, कपालेश्वर ढिकले, गणेश पवार, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, राजू वायकांडे यांनी तपास करून अवघ्या बारा तासांत संशयित कुवर यास अटक केली़ महालपाटणे रस्त्यावर घडलेल्या खुनातील संशयितास जेरबंद करणारे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक़ संशयित कुवरची गुन्हे शाखेने सखोल चौकशी केली असता त्याने काही दिवसांपूर्वी पवार यांच्याकडून दहा हजार रुपये उसनवार घेतले होते व या पैशांची ते वारंवार मागणी करीत होते़ शनिवारी पवार हे कुवरला दुचाकीवरून महालपाटणे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच गाडी थांबवून पवार यांनी मला आत्ताच्या सर्व पैसे पाहिजे, नाहीतर मी तुला मारून टाकीन असे म्हटल्याने दोघांमध्ये झटापट झाली़ यावेळी संशयित कुवर याने दुचाकीच्या चावीस असलेले कटर काढून प्रभाकर पवार यांच्या गळ्यावर वार करून ठार मारल्याची कबुली दिली़
उसनवार पैशाच्या वादातून खून : महालपाटणेची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:03 AM