नाशिक : एमजी रोड परिसरातील वकीलवाडी या वर्दळीच्या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकीवरून आलेल्या वादात टोळक्याने दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी गुरुवारी (दि. ८) रात्री ८ वाजेच्या सुमारास लाठ्याकाठ्यांसह चॉपरचा वापर करीत एकाला जखमी केले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लौकिक प्रशांत लुले (२६) यांने हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी लौकिक आणि आणि शुभम दाते एमजीरोड परिसरात एका दुकानासमोर बसलेले असताना संशयित आरोपी सिद्धेश सोनार, किशोर वाकोडे, दिपांशू आव्हाड व अमृत भास्करे यांनी जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी त्या दोघांचा पाठलाग केला. लौकिक आणि शुभम यांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी आणि चारचाकीमधून आलेल्या टोळक्याने हातात लाठ्याकाठ्या व चॉपर घेऊन दोघा मित्रांचा पाठलाग करीत लौकिक लुले यास गाठून त्याच्यावर चॉपरने वार करीत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून, एका फरार संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.