नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस हवालदार विजय संतोष मोरे (४८, रा. मेरी कॉलनी) हे पिंपळचौक परिसरात गस्त घालत असताना त्यांच्यावर टोळक्यामधील तिघांनी लाकडी दांडक्याने हल्ला केला.भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये नियुक्त असलेले मोरे (बिट मार्शल) हे दिवसपाळीवर होते. गुरुवारी (दि. ८) रात्री ८ वाजेच्या सुमारास पिंपळचौक-नवापुरा या भागात ते दुचाकीवरून (एमएच १५, इए १७१) गस्त घालत असताना काही युवक आपापसात भांडण करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोरे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता तीन ते चार जणांनी लाकडी दांडक्याने पाठीमागून मोरे यांच्या डोक्यावर हल्ला केला. डोक्याला गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. पोलीस कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती मिळताच गस्त पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. मोरे यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड आदि अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मोरे यांची विचारपूस करत हल्ल्याबाबतची माहिती जाणून घेतली. भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, सरकारवाडा पोलीस ठाण्यासह ग्रामीण पोलिसांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. तसेच तिघा संशयित हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शोध पथकाला पाचारण करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून रात्रीच संशयित हल्लेखोरांना अटक केली जाणार असल्याचा विश्वास सिंघल यांनी व्यक्त के ला आहे.
पोलिसावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: September 09, 2016 2:19 AM