नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने थकीत कर्जदारांविरुद्ध मोहीम हाती घेतली असली तरी, त्यात सर्वप्रथम राजकीय व बॅँकेचे विरोधक पहिल्या टप्प्यात रडारवर आले आहेत. माजी मंत्री प्रशांत हिरे यांची पत्नी स्मिता हिरे संस्थापक संचालक असलेल्या मालेगाव तालुक्यातील द्याने शिवारात असलेल्या रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे जिल्हा बॅँकेने मूल्यांकन पूर्ण केले असून, लवकरच या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याची तयारी चालविली आहे. हिरेंपाठोपाठ जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष देवीदास पिंगळे यांच्या आनंद ग्रेप संस्थेचीही मालमत्ता विक्री करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावण्यास धोरणबाह्य कर्जवाटपदेखील तितकेच कारणीभूत ठरल्यामुळे संचालक मंडळाने सक्तीची वसुली मोहिम राबविणे सुरू केले आहे. त्याचाच पहिला दणका हिरे यांच्या रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेला बसणार आहे. जिल्हा बॅँकेला रेणुकादेवी संस्थेचे १४ कोटी २६ लाख ४१ हजार रुपये येणे बाकी असून, सप्टेंबर २०१७ मध्ये बॅँकेने सदर संस्थेची मालमत्ता जप्त केली होती. परंतु त्यानंतर पुढील कार्यवाही थांबविण्यात आली. आता बदलत्या राजकीय समिकरणाचा फायदा घेत संस्थेची जप्त मालमत्ता जाहीर लिलावात काढण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा बॅँकेने अलीकडेच जप्त मालमत्तेचे मूल्यांकन पूर्ण करून घेतले असून, लवकरच सदर संस्थेस कर्ज भरण्याची अंतिम नोटीस दिली जाईल व त्यानंतर मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. अशाच प्रकारे राष्टÑवादीचे माजी खासदार व जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष देवीदास पिंगळे यांच्याशी संबंधित आनंद ग्रेप सहकारी संस्थेविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. आनंद ग्रेपकडून जिल्हा बॅँकेला ७० लाखांहून अधिक घेणे आहे. सदर संस्थेची तारण मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्याची अनुमती मिळावी यासाठी जिल्हा बॅँकेने विभागीय सहनिबंधकांकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा बॅँकेच्या प्रशासनाने कळविले आहे.
हिरेंच्या जप्त मालमत्तेचे मूल्यांकन पूर्ण जिल्हा बॅँक वसुली : पिंगळेंचाही नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 2:10 AM
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने थकीत कर्जदारांविरुद्ध मोहीम हाती घेतली असली तरी, त्यात सर्वप्रथम राजकीय व बॅँकेचे विरोधक पहिल्या टप्प्यात रडारवर आले आहेत.
ठळक मुद्देमालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याची तयारी पहिला दणका यंत्रमाग औद्योगिक संस्थेला बसणार