नाशिक : २६ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत पदाचा दुरुपयोग व भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून सहायक प्रादेशिक परिवहन अधिका-याने आपल्या उत्पन्नापेक्षा तब्बल ७१ टक्के अपसंपदा जमविल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी मुंबई - अंधेरी येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शामराव महादेव शेटे व त्याची पत्नी शर्मिला शेटे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शामराव शेटे यांच्याविरोधात अपसंपदेबाबत तक्रार करण्यात आली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केलेल्या तपासात आरोपी शामराव महादेव शेटे यांनी २१ मार्च १९८६ ते १२ मार्च २०१२ या कालावधीत शासकीय सेवेत कार्यरत असतांना पदाचा दुरूपयोग करुन अवैध भ्रष्ट मार्गाने उत्पन्नाचे स्रोतापेक्षा ६९ लाख १७ हजार २२८ रुपयांची म्हणजेच ७०.९१% एवढी अपसंपदा स्वत:च्या व पत्नी शर्मीला शेटे यांच्या नावे संपादित करुन धारण केल्याचे निष्पन्न झाले़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शेटे दाम्पत्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे़