नाशिक : नाशिक शहरात होऊ घातलेल्या ९४ व्या साहित्य संमेलनासाठी जी काही मदत लागेल ती करण्यास मी तत्पर असेन, अशी ग्वाही नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
संमेलनाच्या अस्थायी समितीने महापौरांची भेट घेतली. त्यावेळी महापौर बोलत होते. महापौर सतीश कुलकर्णी हे २० जानेवारीला स्वत: संमेलनस्थळाची पहाणी करणार असून त्यावेळी महापालिकच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना देणार आहेत. महापौरांनी पहाणी केल्यानंतर २१ जानेवारीला गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या आवारात तयार होत असलेल्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर संमेलनाच्या कामकाजाला या कार्यालयातून सुरुवात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील, सतीश सोनवणे, यशवंत निकुळे उपस्थित होते.
यावेळी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर, रमेश देशमुख, लक्ष्मण सावजी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सचिव सुभाष पाटील, मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संजय करंजकर, देवदत्त जोशी, चारुदत्त कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुणवंत कामगार प्रशात कापसे, संवादचे अभिमन्यू सूर्यवंशी, प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी संमेलन संयोजन समितीकडे धनादेश सुपुर्द केले. दरम्यान, माजी खासदार समीर भुजबळ यांनीदेखील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसची पाहणी करून लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संमेलन आयोजनाबाबत संवाद साधला. यावेळी त्यांनी संमेलनाच्या आयोजनातील सूक्ष्म बाबींवरदेखील चर्चा करून नियोजनात त्रुटी राहू नयेत, यासाठी काही सूचना केल्या.
लोगो=----
साहित्य संमेलन लोगो वापरावा.