सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.२८) सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारी (दि.१) रात्री उशिरा पेढे भरून मागे घेण्यात आले आहे.मात्र जिल्हाधिकार्यांशी सोमवारी (दि.४) चर्चा होईपर्यंत उपोषणकर्त्यांचा मुक्काम उपोषण स्थळीच राहणार आहे.आराई येथील गोरल्या नाल्यावर शासनाने सन १९९५-९६ मध्ये पाझर तलाव बांधला होता. या तलावासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन मात्र संबंधित विभागाने १५ फेब्रुवारी २००० मध्ये केल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षात मात्र या जमिनी पाझर तलाव बांधल्यापासून कसता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. शासन नियमानुसार पाच वर्षाच्या आत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला अदा करणे बंधनकारक असताना भूसंपादन करून वीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्याप मोबदला मिळालेला नाही. संबधित विभागाने नव्याने मूल्यांकन करून व्याजासह मोबदला द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.शुक्रवारी (दि. १) रात्री उशिरा प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता ,लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता चौधरी ,शाखा अभियंता अविनाश कापडणीस, संजय भामरे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चेच्या तीन फेर्या केल्या. त्यानंतर आमदार दिलीप बोरसे प्र भारी तहसीलदार गुप्ता सोमवारी जिल्हाधिकार्यांशी सकारात्मक चर्चा करून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचा राहिलेला आर्थिक मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपअभियंता चौधरी यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या शेतकर्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा होईपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकरी नरेंद्र सोनवणे ,अरुण सोनवणे, काकाजी देवरे, दिगंबर सोनवणे, विजय सोनवणे, गोकुळ सोनवणे, सुरेश देवरे, माधव देवरे, बाळासाहेब देवरे, दत्तात्रेय देवरे, नामदेव सोनवणे यांनी आपला मुक्काम उपोषणस्थळीच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे.इन्फोआश्वासनानंतरही मोबदला नाहीशेतकऱ्यांनी १६ ऑगस्ट १०१९ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. २० ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारपासून (दि. २८ ) बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते.
आराईच्या शेतकर्यांचे उपोषण मागे आश्वासन : चर्चा होईपर्यंत उपोषणस्थळी मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 5:37 PM