दम्याच्या रु ग्णांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भय आले आहे. कोरोना व दमा दोन्हीही फुफ्फुसांशी निगडित असल्याने ह्या व्यक्तींना आपल्याला याची लागण झाल्यास खूप उपद्रव होतील अशाच विचारात आहेत. ह्या विषयाची शास्त्रीय माहिती निश्चितपणे समोर आली नसल्याने अफवांनाही उधाण आले आहे. संशोधन व अहवालानुसार दम्याच्या व्यक्तींमध्ये काही वेगळी लक्षणे दिसून आलेली नाहीत.कोरोना व दम ह्या दोघांचे आश्रय फुफ्फुस आहे हे सत्य, परंतु सध्या भारतात तरी दम्याचा ‘सिझन’ नाही हे ध्यानात घ्यायला हवे. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरु वातीला, ढग आले असल्यास, खूप कुपथ्य केल्यास, दमट हवामान व वातावरण अशुद्ध असल्याने दम्याचा वेग येताना दिसतो. त्यावेळी श्वासनलिका आकुंचित पावतात व लगेच योग्य उपचाराने पूर्वस्थितीत येतातही. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर अगोदर जर योग्य चिकित्सा झाली नसेल, इतर व्याधींचा संसर्ग वाढला, मधुमेह सारख्याचे नियंत्रण नसेल, तर फुफ्फुसांवर त्याचा प्रभाव होऊन कार्य कमी होते,त्रास होतो, श्वासाला त्रास होतो, श्वास गती वाढताना दिसते. दम्याच्या वेगामध्ये तात्पुरती श्वास गती वाढून श्वासाला त्रास होतो.दम्याचा पूर्वइतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे, हेही तितकेच सत्य आहे. पहिली काळजी म्हणजे औषधे वेळेवर घेत राहणे (जी औषधे सुरू असतील, ज्याने बरे वाटत असेल ती), आहार (कफविरोधी आहार सेवन करणे, कफ वाढविणारा म्हणजे काजू, काकडी, बेकरीचे पदार्थ, अति थंड पाणी, रासायनिक पदार्थ असलेले हबाबंद पदार्थ, खव्याचे पदार्थ, उसाचा रस पूर्ण टाळणे). विहार (गार हवेत झोपणे, थंड वारा अंगावर घेणे, गोड खाल्ल्यानंतर पाणी घेणे, दुपारी जेवणानंतर लगेच झोपणे हे टाळणे) हे अगदी काटेकोरपणे पाळणे. सतत गरम पाण्याने हात धुणे. संपूर्ण मुखाला, तोंडाला कपड्याने सुरक्षित करणे. नाका मध्ये आतील बाजूला शुद्ध गाईचे तूप लावणे (नस्य). रात्री डोक्याला तेल लावून झोपणे हे नियम पाळायला हवे. दम्याचा वेग येऊ नये ही काळजी घ्यावी. आहारामध्ये गरम मसाल्याचे पदार्थ वेलची, तमालपत्र, दालचिनी, लवंग, आले, लसूण, मोहरी, केशर ह्यांचा उपयोग अधिक करावा.कोरोनाची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठीसुद्धा ह्याचा उपयोग होतो. दूध घेण्याची सवय असल्यास रात्री झोपताना थंड दूध घेऊ नये. दूध सुंठ, पिंपळी टाकून संध्याकाळी वा सकाळी घ्यावे. ह्यामध्ये केशर, दालचिनी, वेलची टाकून घेतल्यास फायदा संभवतो. थंड दूध मुलांना देऊ नये. सध्या बाजारात मिळणारे थंड सुगंधित दूध देऊ नये. दुधामध्ये अधिक साखर टाकून सेवन करू नये. मध टाकून सुंठ-दूध घेतल्यास अधिक उत्तम. कोरोना विषयाची इतर सर्व काळजी आवश्यक आहे. उतार वयातील व्यक्तींनी औषधांची मात्रा पुन्हा डॉक्टर, वैद्याला विचारून निश्चित करावी. श्वासाचे व्यायाम आवश्यक आहेत. दमा असल्यास योग्य काळजी घेऊन कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवता येईल. फक्त न घाबरता सामोरे जा, म्हणजे आपले कर्तव्य करा.
- वैद्य विक्र ांत जाधव