नाशिक : येत्या १८ व १९ मे रोजी नाशिक शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु- ज्योतिष अधिवेशनाला महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कडाडून विरोध केला आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करून दाखवावे, तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत यापूर्वीच दिलेले आव्हान पेलून दाखवावे, असे समितीने म्हटले आहे.नाशिकमध्ये होणाऱ्या या वास्तु-ज्योतिष अधिवेशनाची तयारी सुरू आहे, मात्र दुसरीकडे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस ठकसेन गोराणे, राज्य सदस्य राजेंद्र फेगडे आणि जात पंचायत बाबतीतील राज्य समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी यासंदर्भात विरोध करणारे निवेदन दिले आहे. फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र निव्वळ थोतांड आहे. प्रचलित वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त लोकांच्या अज्ञानाचा, अगतिकेतचा फायदा होऊन काही धूर्त व्यक्ती आणि संस्था राजरोसपणे समाजाची आर्थिक व मानसिक लूट करतात. असा आरोप करण्यात आला असून, अशा प्रकारच्या फसव्या तंत्राच्या नादी लागून कोणीही अधिवेशन तसेच परिषदांना उपस्थित राहू नये, असे आवाहन अंनिसने केले आहे़सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती व कोणकोणते उमेदवार निवडून येतील, त्यांची टक्केवारी काय असेल, नोटा किती लोक वापरतील अशा आशयाच्या २५ प्रश्नांची प्रश्नावली अगोदरच संघटनेने जाहीर केली असून, ती २० मेच्या आत संघटनेकडे पाठविण्यात यावी. प्रत्यक्ष निकालानंतर ज्योतिषांचे ठोकताळे तपासून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाºयास २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यातही सहभाग नोंदविण्याचे आव्हान समितीने दिले आहे.
ज्योतिष अधिवेशनाला अंनिसचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:55 AM