नाशिक : दीड दशकानंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथालेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार असल्याचे संमेलनाध्यक्ष निवडीनेच संकेत दिले आहेत.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत संमेलनाध्यक्षपदाची घोषणा केली. महामंडळाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शनिवारपासून नाशिकमध्ये बैठका सुरू असून त्यातून डॉ. नारळीकर यांच्या नावाला बहुमताने पसंती देण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले. महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. तेव्हापासूनच डॉ. नारळीकर यांच्या नावाची चर्चा होऊन रविवारी त्यावर मोहर उमटवण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केले. या वेळी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, विलास मानेकर, प्रदीप दाते, आयोजक लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
२६ मार्चला संमेलनाचा शुभारंभ
यंदाच्या साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसची निवड करण्यात आली आहे. तसेच सर्वसंमतीने आणि रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ मार्च ते २८ मार्च या काळात संमेलन घेण्याचा निर्णय झाल्याचेदेखील ठाले पाटील यांनी सांगितले. २६ मार्चला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या संमेलनाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.
इन्फो
पदासाठी अन्य नावांचीही चर्चा
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विदर्भ साहित्य संघाकडून आलेले भारत सासणे तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे नावदेखील चर्चेत होते. तसेच महामंडळाच्या प्रथेनुसार आयोजक लोकहितवादी संस्थेने नाशिकचे प्रख्यात साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नाव सुचविल्याने त्यांचे नावदेखील अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. त्याशिवाय रामचंद्र देखणे, डॉ. बाळ फोंडके यांची नावेदेखील आली होती. मात्र, महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर डॉ. नारळीकर यांचेच नाव एकमताने नसले तरी बहुमताने निश्चित करण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केले.
इन्फो
डॉ. नारळीकर यांची तिन्ही दिवस उपस्थिती
डॉ. नारळीकर हे तिन्ही दिवस साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार असून त्यांचे संमतीपत्र महामंडळाला प्राप्त झाले असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. काही काळापूर्वी डॉ. नारळीकर यांच्या पत्नी मंगलाताई यांनी त्यांच्या उपस्थितीबाबत नकार दर्शवल्याचे विधान का केले, त्याबाबत माहीत नसल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले. साहित्य संमेलनाचे उद्घाटन राजकीय क्षेत्रातील मान्यवरांपेक्षा एखाद्या मोठ्या लेखकाच्याच हस्ते करण्यात यावे, असा प्रयत्न आम्ही गत वर्षापासून करीत आहोत. त्यानुसार यंदाच्या संमेलनाचे उद्घाटनदेखील लेखकाच्याच हस्ते केले जाणार असल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले.
इन्फो
सहस्रचंद्र दर्शनाला परवानगी नाही
संमेलनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहस्रचंद्र दर्शन करण्याचे माध्यमांकडूनच ऐकले असून तसे काहीही होणार नाही. नाशिकच्या आयोजकांनी तसा विचार मांडला तरी साहित्य महामंडळ त्याला परवानगी देणार नसल्याचे ठाले पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सहस्रचंद्र दर्शनाचा मुद्दाच निकाली निघाला आहे.