नाशिक : माहेरून एक लाख रूपये आणण्यासाठी सुनेवर दबाव वाढवून महिनाभरात तिला माहेरी पाठवून दिले. आपआपसांत समझौता करण्यासाठी वडाळागाव पोलिस चौकीमध्ये विवाहिता, तिचा पती व नातेवाईक एकत्र जमले. यावेळी संशयित इमरान हुसेन शेख याने त्याच्या पत्नीला तीनवेळा ‘तलाक’ शब्द उच्चारून ‘तुझा माझा आता संबंध राहिला नाही...’ असे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडित फिर्यादी विवाहितेचे लग्न २० नोव्हेंबर २०२२साली संशयित इमरान शेख याच्यासोबत झाले. लग्नाला जेमतेम महिना होत नाही, तोच पिडित विवाहितेला माहेरून एक लाख रूपये आणण्यासाठी शारिरिक-मानसिक छळ करून माहेरी काढून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तेव्हापासून फिर्यादी महिला माहेरीच होती. समझौता करण्यासाठी विवाहितेच्या माहेरचे व सासरचे लोक पाथर्डीफाटा येथे येणार होते. यावेळी संशयित इमरान याने शुक्रवारी (दि.१) दुपारी दीड वाजेच्या सुमारास वडाळा पोलीस चौकीत धाव घेऊन बायकोच्या माहेरचे लोक मारण्यासाठी येणार असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पिडित विवाहितेला फोन करून खातरजमा केली असता, तसेच काहीच नसल्याचे समोर आले. पिडित विवाहिता ही आई, काका, दाजी यांच्यासोबत पोलीस चौकीत आले. यावेळी तिचा पती, सासु-सासरे, दीर असे सगळे एकत्र आले. यावेळी पिडितेने पतीला ‘माझ्या आयुष्याची बरबादी का केली...? असं विचारले असता त्याने तीनदा तलाक शब्द उच्चारून ‘तुझा माझा संबंध आजपासून संपला’ असे सांगून टाकले. या दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मुस्लीम महिला विवाहित अधिकार संरक्षण कायद्यान्वये संशयित इमरान शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.