सुनील भास्कर ।ग्रामीण भागातील जे खेळाडू चांगला परफॉर्मन्स देतात, त्यांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यापैकी काही मुले दुर्लक्षित राहतात. मोनिका आथरे ही ग्रामीण भागातूनच आली आहे. तिला छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. धावपटू होण्यासाठी तिला ज्या अडचणींचा सामना करायला लागला, तो नवीन खेळाडूंना येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत तिने व्यक्त केले.प्रश्न : धावपटू म्हणून यश मिळविण्यासाठी सरावाबरोबर आणखी कशाला महत्त्व द्यावे?उत्तर : प्रत्येक खेळाडूला ज्या त्या खेळाच्या नियमित सरावाबरोबरच योगासने, ध्यान-धारणा आणि जीवनाची एक विशिष्ट शैली आवश्यक आहे. कसून सराव करतानाच आहार किती घ्यावा यालाही खूप महत्त्व आहे. जास्त सराव झाल्यास जसा धोका होऊ शकतो त्याचप्रमाणे जास्त आहार घेतल्याने त्याचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.प्रश्न : नियमित सराव किती असतो?उत्तर : मी भोसला स्कूलच्या मैदानावर आठवड्यातून किमान दोनशे किलोमीटर धावते. प्रत्येकाच्या शरीराला किती व्यायाम आवश्यक आहे याचे मोजमाप ठरलेले असते. शरीराच्या ठेवणीनुसार किती सराव करायला हवा, याचा प्रत्येक खेळाडूचा आवाका हा वेगवेगळा असतो; परंतु स्पर्धेत धावण्यासाठी प्रचंड सराव करावा लागतो.प्रश्न : आतापर्यंत खेळलेल्या स्पर्धांपैकी कोणती महत्त्वाची वाटली?उत्तर : दि. ६ आॅगस्ट २०१७ रोजी लंडन येथे झालेली वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा महत्त्वाची होती. कारण ही आॅलिम्पिक स्तरावरील स्पर्धा आहे. या स्पर्धेत शंभर स्पर्धकात माझा ६४वा क्रमांक होता. ४२ किलोमीटरची ही फुल मॅरेथॉन स्पर्धा होती. दिल्लीत झालेल्या नॅशनल मॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर माझी यासाठी निवड झाली होती. या स्पर्धेत मी केलेल्या कामगिरीत अधिक सुधारणा केल्यास मी आॅलिम्पिकमध्ये खेळू शकते, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.प्रश्न : आहार कसा असावा?उत्तर : व्यायामानुसार आहार असावा. प्रोटीन जास्त प्रमाणात घ्यावेत. शरीराची झीज भरून काढण्यासाठी आराम व योग्य आहार आवश्यक आहे. धावण्याचा सराव करताना खूप पाणी प्यावे लागते. उकडलेले रताळे, बटाटे याबरोबरच केळी, पपई, डाळींब व हंगामात येणारी फळे घ्यावीत.
आर्थिक पाठबळ महत्त्वाचेकोणत्याही खेळाडूला आर्थिक पाठबळ महत्त्वाचे आहे. भोसलातील १२ खेळाडूंना महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीतर्फे मोलाची मदत केली जाते. जिंकून आल्यानंतर सत्कार केला जातो. त्यांच्याकडून शूज, मेस, होस्टेल, फळे औषधे पुरविली जातात.
दुखापत नकोकोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये. दुखापतग्रस्त खेळाडू एकटा पडतो; परंतु माझ्यावर डॉक्टरांनी मोफत उपचार केले आहेत. सध्या माझा पाय दुखतो आहे. लवकरच तो बरा होईल आणि मी मैदानावर येईल.
एलआयसी अधिकाऱ्यांचे प्रोत्साहनमी २०१२ साली एलआयसीत नोकरीला लागले. या कार्यालयातील माझ्या सर्व सहकाºयांनी मला सहकार्य केल्यामुळेच मी नियमित सराव करू शकते. एलआयसीचे सिनिअर डिव्हिजनल मॅनेजर तुळशीराम गडपायले, मार्केटिंग मॅनेजर नरेंद्र गिरकर, प्रबंधक कार्मिक रवींद्र सामंत आदी अधिकाºयांच्या सहकार्यामुळेच मी यश मिळविले आहे. सभोवतालच्या मुलांचे खेळातील नैपुण्य हेरून त्या खेळाचा त्याला शास्त्रोक्तसराव कसा मिळेल हे बघणे आपले कर्तव्य आहे. -मोनिका आथरे