एसटीच्या स्थानकात मनपाची बस : कर्मचाऱ्यांमध्येही उलटसुलट चर्चा
नाशिक : नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेसाठी एसटीच्या जागांचा वापर करण्याबाबतचा अद्याप धोरणात्मक निर्णय झालेला नसताना पंचवटीतील निमाणी बसस्थानक महालिकेच्या बसेसला वापरासाठी देण्यात आल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एसटीतील अधिकारीदेखील याबाबत अनभिज्ञ असल्याने याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेने शहर बससेवा सुरू केली असून, नाशिकरकांकडून या बसेसला पसंतीदेखील मिळत आहे. नाशिककरांसाठी बससेवा सुरू करताना मनपाने महामंडळाकडे काही बसस्थानकांच्या जागांची मागणी केली होती, मात्र महामंडळाने अव्वाच्या सव्वा भाडेदर दिल्याने मनपाने हा विचार सोडून दिला आहे. असे असतानाही महामंडळाच्या निमाणी बसस्थानकाचा वापर हेात असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाने शहर बसेस बंद केली असल्याने निमाणी बसस्थानकातून ग्रामीण भागासाठी बसेस सेाडण्यात येतील असे नियोजन करण्यात आले हेाते. मात्र त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मनपाच्या बसेससाठीच ग्रामीण बसेसचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याचा संशय एस. टी. कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.
--इन्फो--
मिळालेल्या माहितीनुसार निमाणी बसस्थानक मनपाच्या बसेसला देण्याबाबतचे कोणतेही पत्र नाशिक डेपो क्रमांक दोन यांना प्राप्त झालेले नाही. परंतु शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी तूर्तास सामंजस्याने निमाणी बसस्थानक वापरले जात असल्याचे बोलले जात आहे.
--कोट--
निमाणी बसस्थानक महापालिकेच्या बसेससाठी वापर करण्यास देण्याबाबतची मंजुरी अद्याप आलेली नाही. याबाबतचे पत्र सेंट्रल ऑफिसला पाठविण्यात आले आहे. तूर्तास प्रवाशांच्या सोयीसाठी मनपा या जागेचा वापर करीत आहे.
- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक
180721\18nsk_58_18072021_13.jpg
निमाणी स्थानकात मनपाच्या बसेस