वावी हे दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे गाव असून येथील आठवडे बाजार तसेच परिसरात व्यापारी वर्ग मोठा असल्याने खातेदारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. वावी शाखेशी वावीसह आसपासच्या ३० ते ३५ गावांचा संपर्क असल्यामुळे शाखेत सकाळी दहा वाजेपासून खातेदार गर्दी करायला सुरुवात करतात. शाखेत जागा कमी असल्यामुळे एक-एक तास ग्राहकांना पैसे काढणे व टाकण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. अशा परिस्थितीत एटीएम असल्यावर थोडीफार का होईना गर्दी कमी होईल या उद्देशाने सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी शाखेने एटीएम सुरू केले होते. मात्र महामार्गाचे रुंदीकरणाच्या कामात आलेले हे एटीएम बंद करण्यात आले. त्यानंतर एटीएमसाठी अहिल्यादेवी चौक याठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्याचे समजते. वरिष्ठांकडून जागेची पाहणीदेखील करण्यात आली आहे. मात्र संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल न घेता गेली सहा महिन्यांपासून एटीएमबाबत बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वावी शाखेचे एटीएम त्वरित सुरू करून खातेदारांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील खातेदारांकडून होत आहे.
चौकट -
वावी येथील महाराष्ट्र बँक शाखेचे एटीएम गेल्या सहा महिन्यापासून बंद असून यासंदर्भात वावी शाखेसह नाशिक झोनल अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. खातेदारांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होत असून पैसे काढण्यासाठी १-२ तास ताटकळत उभे राहावे लागते. खातेदारांचा हा वेळ वाचवण्यासाठी एटीएम तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे.
-संतोष जोशी, तालुका उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी