पिंपळगाव बसवंत : शहरातील वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, आईवडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. पोलिसांनी संशयित नराधमाविरोधात बाल लैंगिक प्रतिबंध अंतर्गत ( पॉस्को) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय बालिकेवर संशयित आरोपी शकील शब्बीर पिंजारी (वय २३) रा. वीटभट्टी, पिंपळगाव बसवंत याने ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. जर तू हे कोणाला सांगितले तर खून करण्याची धमकीही दिली. बळजबरीने संशयित आरोपी पिंजारी यांनी अत्याचार केला. त्यामुळे मुलीने घाबरून ही बाब आईला सांगितली. आईने नातेवाईकांसह पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी तत्काळ संशयित आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले असून, अधिक तपास पोलीस सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.