नाशिक : महाराष्ट्रसारख्या राज्यात डॉक्टरी पेशा सांभाळणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले होणे हे निंदणीय आहे; मात्र असे हल्ले का होतात याचादेखील अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आता समीप आली आहे. डॉक्टरांनी संपावर जाणे हे एकप्रकारे जबाबदारी झटकण्यासारखेच आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले.नाशिक येथील आयएमएच्या वार्षिक पदग्रहण सोहळ्याप्रसंगी निकम प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या सोहळ्यात व्यासपिठावर राज्याध्यक्ष डॉ. अशोक तांबे, शहराध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. आवेश पाटील, डॉ. अनिरुध्द भांडारकर उपस्थित होते.ेंयावेळी निकम बोलताना म्हणाले, डॉक्टरांनी रस्त्यावर उतरणे चुकीचे असून डॉक्टर जेव्हा संपावर जातात तेव्हा सर्वसामान्य गरजूंनी कोठे अन् कोणाकडे बघावे, याचा विचार संपावर जाण्यापुर्वी करावा असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला. डॉक्टरांनी एखाद्या कामगार संघटनांप्रमाणे वर्तन करु नये किंबहुना त्यांना हे शोभणारेही नाही. डॉक्टरी पेशा समजून घेत त्यांनी जबाबदारी पार पाडावी. डॉक्टरांनी आपल्या पाल्यांना बौध्दिक क्षमता नसतानाही डॉक्टर होण्यासाठी दबाव टाकत असतील तर समाजात बेकायदेशीर वैद्यकिय उपचार करण्याच्या विकृ ती वाढीस लागण्याचा धोका अधिक बळावतो, असेही ते म्हणाले.