निफाड : तालुक्यातील कोठुरे येथे शुक्र वारी रात्री मोटारसायकलवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मोटारसायकलवर मागे बसलेली महिला जखमी झाल्याची घटना घडली.कोठुरे येथील बाळासाहेब जानकीनाथ मोगल हे कोठुरे फाट्याजवळ राहतात. महाशिवरात्रीनिमित्त कोठुरे येथील बाणेश्वर मंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी बाळासाहेब मोगल व पत्नी मंदाबाई मोगल हे दोघे मोटारसायकलवर जात होते. कोठुरे फाट्यापासून ३०० फूट अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर झेप घेत मंदाबाई यांच्या डाव्या पायावर हल्ला केला. यात बिबट्याच्या पंजाची नखे पायात घुसल्याने त्या जखमी झाल्या. अचानक झालेल्या हल्यामुळे बाळासाहेब मोगल व पत्नी मंदाबाई घाबरले व त्यांनी बचावासाठी आरडा-ओरड केल्याने वस्तीवरील तसेच ये-जा करणारे नागरिक जमा झाले. लोकांच्या आवाजामुळे बिबट्या पसार झाला. त्यानंतर मंदाबाई यांना तातडीने उपचारासाठी कोठुरे येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी निफाड उपजिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले.मनमाडचे वनपाल जी. बी. वाघ, वनसेवक भय्या शेख यांनी कोठुरेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला. कोठुरे व शेजारील जळगाव येथे बिबट्या सातत्याने दर्शन देत असल्याने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोठुरेत बिबट्याचा मोटारसायकलवर हल्ला; महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:59 PM