नाशिक : पखालरोडवरील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या काझी कुटुंबीयांच्या घरात बळजबरीने चोरट्याने प्रवेश केला. घरात एकट्या असलेल्या महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला चढविला. त्यामध्ये शमशाद अन्सारोद्दीन काझी (५५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. चोरट्यानी शमशाद यांच्या अंगावरील तीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
पखालरोडवरील करिफा अपार्टमेंटमध्ये राहणारे शिक्षक असद अनारुद्दीन काझी हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. सोमवारी (दि.७) भरदुपारी त्यांच्या घरात एका चोरट्याने प्रवेश केला. यावेळी काझी यांच्या मातोश्री शमशाद घरात एकट्याच होत्या. चोरट्याने त्यांच्यावर लोखंडी जड वस्तूने हल्ला चढविल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. डोक्यावर चोरट्याने प्रहार केल्यामुळे त्या घरातच कोसळल्या. चोरट्याने त्यांच्या हातातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, एक तोळ्याची त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी असा सुमारे ९० हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने पखालरोड परिसरात दहशत पसरली आहे. जखमी अवस्थेत शमशाद यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. असद काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज संकलित करत त्यांची पडताळणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--इन्फो--
चोरट्यांची मजल वाढली; पोलिसांना आव्हान
पादचारी महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून पसार होणाऱ्या चोरट्यांकडून आता घरात शिरून महिलांना लक्ष्य करण्यापर्यंत मजल गेल्याने पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे बाेलले जात आहे. भरदिवसा पखालरोडवरील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये येऊन चोरट्याने महिलेवर हल्ला चढवून दागिने लुटल्याच्या घटनेने पोलिसांना उघडपणे आव्हान दिले आहे.