नाशिक : वृक्षतोडीबाबत महापालिकेने हरकती मागविल्या होत्या. ज्यांनी हरकत घेतली त्यांची व झाड तोडण्याबाबत अर्ज करणाऱ्या नागरिकांची सुनावणी महापालिकेच्या उद्यान विभागाने गंगापूर रोड येथे आयोजित केली होती. यासाठी वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी उपस्थित राहिले होते. तसेच झाड तोडण्याबाबत संमती देणारे गंगापूर रोडवरील रहिवासीही उपस्थित होते. यावेळी अचानकपणे काही समाजकंटकांनी पर्यावरणप्रेमींवर धावून जात धक्काबुक्की करत मारहाण करून तेथून हुसकावून लावल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
गंगापूर रोडवर अडथळा ठरणारे वटवृक्ष महापालिका हटविणार आहेत. याबाबत जाहीर नोटीस मनपाने दिली आहे. नोटिसीद्वारे हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. ज्या हरकती प्राप्त झाल्या त्यांची सुनावणी मंगळवारी (दि.२) गंगापूर रोडवरील एका चौकात सकाळी १० वाजता ठेवण्यात आली होती. यावेळी दोन्ही बाजूंच्या लोकांचा युक्तिवाद सुरू होता. यावेळी उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. अचानकपणे चर्चेचे रूपांतर वादविवादात होऊ लागले अन् त्याचे पर्यावसान शिवीगाळ, हाणामारीमध्ये झाले. अचानकपणे झालेल्या हल्ल्याने पळापळ होऊन गंगापूर रोडवर गोंधळ निर्माण झाला. यावेळी पर्यावरणप्रेमी मनोज साठे, जगबीर सिंग, आनंद रॉय, विशाल देशमुख यांना धक्काबुक्की करत समाजकंटकांच्या टाेळक्याने मारहाण केली. त्यांना जबर मुकामार लागला आहे. याचवेळी काही महिला पर्यावरणप्रेमींसह अंबरीश मोरे, ऋषिकेश नाजरे, अंकुश मगजी यांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळाहून पर्यावरणप्रेमींनी ११२ क्रमांक फिरवून मदत मागितली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले.
राड्याचा व्हिडीओ व्हायरल!
गंगापूर रोडवर पर्यावरणप्रेमींना मारहाण करणाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल होत होता. विविध पर्यावरण व निसर्गप्रेमींच्या ग्रुपमध्ये हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडीओवरून घडलेल्या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला गेला. झाडे वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मारहाण केली जाते, याचा निषेध नोंदवून अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे.