नाशिक : सिडको परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दोन दिवसांपूर्वी उपचार घेताना एक रुग्ण दगावल्याने त्याच्या नातेवाईकांनी सोमवारी(दि.3) रूग्णालयात दाखल होत डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश करून डॉक्टरांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ वायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हल्ल्याप्रकरणी संताप व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत डॉक्टर यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दोन दिवसांपूर्वी सिडको येथील एका खासगी रुग्णालयामध्ये कोरोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. दरम्यान, उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे नातेवाइकांनी रुग्णालयात येत डॉक्टरांना जाब विचारत 'रुग्ण निगेटिव होता तर तो मृत्युमुखी कसा पडला? असा प्रश्न विचारत आगाऊ डिपॉझिट केलेल्या रक्कमेची मागणी करत नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार त्यांच्या केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेची माहीती डॉक्टरांनी तात्काळ पोलीस ठाण्याला कळविली. तसेच पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत असून अंबड पोलीस ठाण्यात शहरातील खासगी डॉक्टर यावेळी एकत्र आले होते. डॉक्टरांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.