मंदोदी रेल्वेगाडीमध्ये रेल्वेत चहा विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर (वेंडर) तिघा युवकांनी चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
विशाखापट्टणमहून मुंबईला जाणाऱ्या मंदोदी रेल्वेगाडीतील कोच नंबर एस ५ मध्ये रविवारी सकाळी ९ वाजता पॅन्ट्री कार वेंडर अमनसिंह महेशसिंह चौहान (१९) व पवनकुमार शिवप्रसाद (२६) हे प्रवाशांना चहा विकत होते. एस-५ कोचमध्ये सीट क्रमांक ४०-४१ वर बसलेल्या तिघा युवकांनी अमनसिंह व पवनकुमार यांना रेल्वेमध्ये चहा विकू नका, असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण करत त्या दोघांच्या हातावर, गालावर, मनगटावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत अमनसिंह याच्या खिशातील आठ हजार ९०० रुपये गहाळ झाले. देवळाली स्थानक येताच तिघे संशयित गाडीची चेन ओढून पळून गेले. पॅन्ट्री कारचे व्यवस्थापक सरोज महम्मद यांना दहा दिवसापूर्वी भुसावळ येथील बंटी पत्रोळ याने तुमच्या मुलांना रेल्वेत चहा विकू देऊ नका अन्यथा चाकूने वार करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.