नाशिक : शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर लागवडीप्रमाणे पीकपेरा लावण्यासाठी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी करून तीन हजार रुपये घेताना गंगापूरचे तलाठी घनश्याम हरि भुसारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़२०) सापळा रचून रंगेहाथ पकडले़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांच्या वडिलांचे गोवर्धन गावातील गट नंबर ८८ क्षेत्र ७़३० आर शेतजमीन असून, त्यामध्ये दोन वर्षांपूर्वी आंबा, पपई, पेरू व नारळ या झाडांची लागवड केलेली आहे़ या लागवडीप्रमाणे सातबारा उता-यावर पीकपेरा लावण्यासाठी तक्रारदाराने वडिलांच्या नावाने अर्ज केला होता़ या अर्जानुसार पीकपे-याची नोंद करण्यासाठी तलाठी भुसारे याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती़ त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तलाठी भुसारेविरोधात तक्रार केली होती़
या तक्रारदाराच्या अर्जाची शहानिशा करून सोमवारी (दि़२०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोवर्धन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीतील गंगापूर तलाठी कार्यालयात सापळा रचला होता़ त्यानुसार तलाठी भुसारे याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़