त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : येथील ज्योर्तिलिंग त्र्यंबकराजाच्या मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मीयांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या घटनेनंतर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टसह नाशिकच्या ब्राह्मण महासंघाने पोलिसांकडे तक्रार अर्ज देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण संयमाने हाताळत शांतता समितीची बैठक बोलावत संबंधितांना समज दिली आहे.त्र्यंबकेश्वर मंदिरात पुरातन काळापासून केवळ हिंदू धर्मीयांनाच प्रवेश दिला जातो. प्रवेशद्वारावर दर्शनी भागात तसा फलकही लावण्यात आलेला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री ९:४५ च्या सुमारास मंदिराच्या बाहेरून अन्य धर्मीयांची मिरवणूक जात असताना त्यातील काही लोकांनी उत्तर महाद्वारातून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविले असता, हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अखेर या जमावाला सुरक्षा रक्षकांनी तेथून बाहेर काढल्यानंतर अनर्थ टळला. या घटनेची खबर लागल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने ही मिरवणूक थांबवत चौकशी केली. देवस्थान ट्रस्टच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली. ही मिरवणूक काढणाऱ्या युवकावर कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांचा प्रवेशाचा प्रयत्न, देवस्थानाकडून तक्रार; संबंधितांना समज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 2:12 PM