नाशिक : तळेगाव अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणास जातीय रंग देण्याचे काम सरकारमधील नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी दलित-मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी केला.नाशिकमध्ये तळेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आलेल्या राणे यांनी जिल्हा रुग्णालयात पीडित बालिकेची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, तळेगाव प्रकरणानंतर पोलिसांनी तणावाची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली़ मात्र, त्यानंतर पोलिसांनी संबंध नसलेल्या लोकांची सुरू केलेली धरपकड ही सरकारमधील मंत्री, स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे आहे, असा आरोप केला नाशिक धुमसत असता पालकमंत्री शांतता प्रस्थापित करण्याऐवजी मुंबईला निघून गेले, अशी टीका करून पालकमंत्र्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. तळेगाव प्रकरणात पंधरा दिवसांत दोषारोपत्र दाखल करण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले, मात्र पंधरा दिवस उलटूनही अद्याप न्यायालयात ते दाखल करण्यात आलेले नाही़, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. बहुजनद्वेषी असलेले भाजपा सरकार हे मराठा समाजाला आरक्षण वा न्याय देऊ शकत नाही. मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत शांततेत निघणाऱ्या मोर्चाची भाषा जर सरकारला समजत नसेल तर यापुढे भाषा बदलावी लागेल व तो उद्रेक हा महाभयंकर असेल़, असेही नीतेश राणे म्हणाले़ (प्रतिनिधी)महाराष्ट्रात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्नतळेगाव अत्याचार प्रकरणानंतर दंगलीस भाजपात प्रवेश करणारे नगरसेवक पवन पवार यांनी प्रोत्साहन दिल्याचा आरोप राणे यांनी केला. पवार यांना भाजपाच्या कोणकोणत्या नेत्यांनी फोन केले याची चौकशी मोबाइलचे सीडीआर रेकॉर्ड मागवून करावी, अशी मागणी आमदार राणे यांनी करीत राज्यात जातीय दंगली घडविण्याचा भाजपा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला़
सरकारकडूनच जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न
By admin | Published: October 26, 2016 12:40 AM