नाशिक: औरंगाबाद शहराच्या नामांतर मुद्द्यावरून काही लोक महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मुद्द्यावर तीनही पक्षांचे प्रमुख नेते सामंजस्याने मार्ग काढतील, असे सांगून या मुद्द्यावरून सरकारमध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरेाप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी नाशिक जिल्ह्याची केारोना आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेत शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे एकत्र बसून, याबाबतीत सामंजस्याने तोडगा काढतील. काही लोक मात्र सरकारमध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करू पाहात आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी किमान समान कार्यक्रमांतर्गत तीनही पक्ष एकत्र आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी सरकार येत जात असतात. सूडबुद्धीच्या भावनाने कुणी राजकारण करू नये, असे सल्ला त्यांनी यावेळी दिला. ईडी कारवाईविषयी तुम्हाला जे वाटते तेच मलाही वाटते, असे विधानही त्यांनी केले. मागील सरकारच्या काळात सुरू असलेले स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टर रोड, तसेच मेट्रोची कामे आम्ही सुरूच ठेवल्याची आठवण त्यांनी करून दिली. विकासात राजकारण आणू नये, असेही मत त्यांनी मांडले.
चार जिल्ह्यांत व्हॅक्सिनचा ड्राय रन घेण्यात आला. फक्त नंदुरबारच्या एका गावात तांत्रिक अडचण आली. सरकार कुणाचेही असले, तरी लस काही पक्षाची नाही. शेवटी हा माणसांच्या जिवाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे, असे सांगून त्यांनी फडणवीस यांनी नियुक्त केलेली वकिलांची समिती तीच आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार कमी पडते, हा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टातही या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय लागावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.
--इन्फो--
पार्थ उमेदवार नसल्याचा पुनरुच्चार
मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना विचारणा केली असता, असा कोणताही विचार किंवा चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवारांच्या उमेदवारीची बातमी चुकीचे असल्याचे ते म्हणाले. या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असला, तरी तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्याशीही चर्चा करूनच उमेदवार दिला जाईल. मात्र, तो उमेदवार पार्थ नसेल, असे म्हणत हा विषय आता थांबवा, असे ते म्हणाले.