र्नाशिक : पाेलीस प्रशासन गुन्हेगाराला पाठीशी घालत असून सामान्य नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेत नसल्याचा आरोप करीत नाशिकच्या एका महिलेने शुक्रवारी (दि.२४) मुंबईत विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना विधानभवनासमाेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, बंदाेबस्तावरील पाेलिसांनी तत्काळ महिलेकडील पेट्राेलची कॅन हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला.
नाशिकधून पोलीस प्रशासनाविरोधातील गाऱ्हाणे घेऊन मुंबईत दाखल झालेल्या राजलक्ष्मी मधुसूदन पिल्ले (४६,रा. मुरलीधरनगर, पाथर्डी फाटा) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने अचानक धावपळ उडाली. मुंबई पाेलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले आहे. यापूर्वी क्रांतिदिनी ९ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नाशकात असताना पिल्ले दाम्पत्याने पोलिसांकडून तक्रारीची दखल घेतली गेली नाही आणि गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचा आरोप करीत पोलीस आयुक्तालयापुढे स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
राजलक्ष्मी मधुसूदन पिल्ले या युवा स्वाभिमानी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष असून, त्यांनी पती मधुसूदन पिल्ले यांच्यासह पोलीस आयुक्तालयासमोर हातात पेट्रोलने भरलेला डबा घेऊन येत स्वत:च्या अंगावर तसेच मधुसूदन यांनी आपल्या अंगावर ओतून घेतले होते. शिवसेना नेते सुनील बागूल यांचा पुतण्या श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागूल यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करीत त्यांनी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पिल्ले कुटुंबीय ३ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी सिडकाेतील त्रिमूर्ती चौकातून जात असताना संशयित अजय बागूल, अंकुश वऱ्हाडे आणि प्रदीप चव्हाण या तिघांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी पिल्ले यांना बळजबरीने रामवाडी भागात नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पिल्ले यांनी अंबड पोलीस ठाणे गाठले. पिल्ले यांनी तक्रार नोंदवण्यासाठी अर्जही दिला. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. पाठपुराव्यानंतर अंबड पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र, त्यामधून बागूल यांना क्लीन चिट देण्यात आल्याने त्यांनी संतप्त होत पोलिसांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पिल्ले दाम्पत्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने राजलक्ष्मी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करीत नाशिक शहर पाेलीस आयुक्तांवर सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करण्याचा आरोप करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला.