नाशिक : कळवण तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांत ग्रामसेवकाने सरपंचाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गैरकारभार केल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली असून, ग्रामसेवकाला नोटीसही बजावण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून यासंदर्भात मकरंद वाघ यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याने त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी गटविकास अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले आहेत. वाघ यांनी आपलं सरकार या पोर्टलवर तक्रार केली असता, प्रारंभी अधिकाºयांनी संगनमत करून सदर तक्रार निकाली काढली होती, परंतु माहिती अधिकार कायद्याचा वापर तसेच ग्रामपंचायतीच्या कारभाराची कागदपत्रे गोळा केल्यानंतर अलीकडेच ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांची चौकशी करण्यात आली. ग्रामपंचायतीने पाण्याची सीमेंटची टाकी बांधण्याऐवजी प्लॅस्टिकची टाकी बसवून तिला चौहोबाजूंनी सीमेंट, विटा उभ्या करून सीमेंटची टाकी बांधल्याचे भासवून पैशांचा अपहार केला, त्याचबरोबर दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ता कॉँक्रीटीकरणाच्या कामातही ग्रामसेवक आर. एस. जाधव याने रकमेचा अपहार केला तसेच तंटामुक्ती योजनेच्या कामांमध्येही अनियमितता केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.ग्रामसेवकाने स्मशानभूमी बांधकाम करताना जागेची निवड व्यवस्थित न केल्याने पाण्याच्या प्रवाहात बांधकाम वाहून गेले असून, जे काही बांधकाम केले त्यालाही तडे गेल्याने सदरचे काम निकृष्ट झाल्याचा निष्कर्ष शाखा अभियंत्यांनी काढला आहे. ग्रामपंचायतींच्या कामांमध्ये झालेली अनियमितता व रकमेचा अपहार पाहता सदरचा खर्च ग्रामसेवक व सरपंचांकडून वसूल करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतानाही ग्रामसेवकाला पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप मकरंद वाघ यांनी केला आहे.
पिळकोस ग्रामपंचायतीचा गैरकारभार दडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:45 AM